जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली आहे.
या दुर्दैवी घटनेतील मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका चुलत भावाचा समावेश आहे. सुमित भरतसिंग राजपूत (वय २०), कुणाल भरतसिंग राजपूत (वय २२) तसेच ऋषिकेश रजेसिंग राजपूत (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडे गावावर एकच शोककळा पसरली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेत मृत्यू झालेले सुमित आणि कुणाल हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर ऋषिकेश हा त्यांचा काकांचा मुलगा होता. एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने राजपूत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघे जण गणपती विसर्जनासाठी गुळ नदीवर गेले होते. गुळ नदीचा प्रवाह असलेल्या निजरदेवजवळ पाण्याचा डोह आहे.
जोरदार पाऊस झाल्याने सध्या या डोहात खूप पाणी आहे. गणपती विसर्जनासाठी डोहाच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरवाडे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरा तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात झाली आहे.