नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानं वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या ट्विटनंतर शिवसेना आमदारांनी दिलेल्या धमकीची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे.
बॉलीवूडसह मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा कंगनाला यावरून सुनावलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थेट धमकीच दिली असून कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिचे तोंड फोडतील, असं म्हटलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की, खासदार संजय राउत यांनी कंगनाला सौम्य शब्दात सांगितलं पण ती जर इथं आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिला चोख प्रत्युत्तर देतील. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की प्रताप सरनाईक यांनी कंगनाला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करायला हवी आणि मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे असंही त्या म्हणाल्या.
कंगनाने केलेल्या ट्विटमधून तिनं देशाविरोधात असं कोणतं वक्तव्य केल्याचं किंवा कोणाला धमकी दिल्याचं वाटत नाही असं राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटलं आहे. यातून शिवसेना नेत्यांची मानसिकता दिसून येते. जर महिला स्वतंत्रपणे त्यांची मते मांडत असतील तर ते पाहवत नसल्याचंही मत रेखा शर्मा यांनी नोंदवले आहे.