मुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर असतानाच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या तीन दिवसावर अधिवेशन आले असता कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अध्यक्ष पटोले हे मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाइन झाले आहेत.
राज्याचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची लागण झाल्यानंतर पटोले हे मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांना करोनाची लागण झाल्याने अधिवेशनाच्या कार्यक्रमात बदल झाल्याबाबत अजून शासनाने काहीही कळवलेलं नाही.
* अशी राहणार उपाययोजना
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. ज्या आमदाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.
* स्वीय सहायकांना ‘नो एंट्री’
सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल. सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जाणार आहे.