औरंगाबाद : भाजपाचे ज्येष्ठ नेते पक्षात सध्या नाराजीच्या परमोच्च स्थानावर आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ खडसेंना शिवसेनेकडून खुली अॉफर दिली आहे. शिवसेनेतील एका नेत्याने कटप्पाने बाहुबलीला कोणी मारले हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे सांगत आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे आवर्जून सांगितले.
शिवसेनेचे नेते आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांना बाहुबलीची उपमा दिली आहे. “कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं ते नव्याने सांगायला नको. त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे. त्यांनी शिवसेनेत यावं. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
“एकनाथ खडसेंनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत सामील व्हावं. त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. त्याचबरोबर शिवसेनेला त्यांचा फायदाच होईल”, असंदेखील अब्दुल सत्तार म्हणाले.