सांगली : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती चांगली असून ते घरीच उपचार घेणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी अलगिकरणात राहून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले आहे.
आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल बाबर, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि चालक अशा तिघांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी आमदार बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि चालक यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सांगली जिल्ह्यातील आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार विक्रम सावंत यांच्यानंतर आता आमदार अनिल बाबर यांना देखील कोरोना झाल्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण सहा आमदारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार बाबर यांचा जनसंपर्क मोठा आहे. गेल्या काही महिन्यात ते कोरोना साथीच्या अटकवासाठी सातत्याने बैठका, दौऱ्यात आहेत. कोरोना बधितांची सोय करणे, विविध गावातून उपाययोजना राबवणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या आमदार बाबर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र आमदार बाबर यांना कोणतीही लक्षणे नाहीत.