पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा नसतानाही पुण्यातील लॉकडाऊन हे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवावा लागला, असा खुलासा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज केला आहे.
पुण्यातील लॉकडाऊन तात्काळ हटवू नये, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा होती, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. “आम्ही स्वतः म्हणतोय लॉकडाऊन उठवा, मग तुम्ही का उठवत नाही.” अशी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. तसेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली तेव्हा भाजीपाला मिळत नाही, अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी ही आमच्यावर दबाव आला, असं अजित पवारांनी लॉकडाऊन उठवण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरुवारी शरद पवार अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेत पोहचले आणि आज शनिवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबतच्या बैठकीत दस्तुरखुद्द शरद पवार हजर राहिले होते. तब्बल पाच तास बैठकीचं सत्र सुरु होतं. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी आणि वृत्तपत्राच्या संपादकांसोबत चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा नसताना पुण्यातील लॉकडाऊन का हटवण्यात आला? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आमची वेगवेगळी मतं होती हे अजित पवारांनी मान्य केलं. कोणत्या देशात काय सुरु झालंय याचे दाखले देत अनेकांनी कोरोनाच्या संकटासोबत जगायला हवं, असं मत व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड तर उद्योग नगरी म्हणूनच ओळखली जाते. लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकला होता. मग हे उद्योग सुरु का केले जात नाहीत? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
* मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता त्यांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील लॉकडाऊन टप्याटप्याने उठवावा, असा सल्ला दिला. पण तितक्यात इथले अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आमच्याकडे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली. “लॉकडाऊन उठवा असं आम्ही स्वतः म्हणतोय, मग तुम्ही का उठवत नाही” असा दबाव आमच्यावर टाकण्यात आला. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन हा घाईघाईने अनलॉकच्या प्रक्रियेकडे वळला. असा खुलासा अजित पवारांनी केला.