पुणे : मराठा आरक्षणाच्या तात्पुरत्या स्थगितीमुळे राज्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच पुढे आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून त्यात प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी निश्चित झालेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जात आहे. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती.परंतु,न्यायालयाच्या आदेशामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे,असे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहिल्या प्रवेश फेरीतून सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून दुसऱ्या फेरीसाठी सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी येत्या १० सप्टेबर रोजी प्रसिध्द केली जाईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
परंतु,अकरावी प्रवेश प्रक्रिया यापूर्वी निश्चित झालेल्या आरक्षणानुसार राबविली जाता आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतच्या पुढील कार्यवाहीची माहिती अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे,असेही राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
* प्रवेशाची संधी हुकण्याची भीती
एसईबीसी आरक्षणाला ही स्थगिती मिळून एकूण प्रवेशाच्या जागांवर याचा परिणाम होऊन आपली प्रवेशाची संधी हुकणार का? अशी भीती विद्यार्थी-पालकांना वाटू लागली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण उपलब्ध जागांपैकी १२ टक्के जागांवर एसईबीसी आरक्षण लागू आहे.