मुंबई : ‘माझ्यात फार संयम आहे. घरची धुणी मी रस्त्यावर कधीच धूत नाही’, असा सणसणीत टोला हाणत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर मौन सोडून सडेतोड उत्तर दिली. देवेंद्र फडणवीसांनी खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावले.
* खडसेंवर टीका करणार नाही
भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड हल्ला चढवत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याने फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली, असा आरोप खडसे यांनी केला आहे. हॅकर मनीष भंगाळेला फडणवीस यांनी रात्री दीड वाजता भेट का दिली?, असा सवालही खडसे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली असता खडसेंवर टीका करणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी आपल्या मनातली सगळी खदखद बाहेर काढली. खडसेंबाबत जे काही घडले ते कायद्याच्या चौकटीतच झालेले आहे, असेही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका वा टिपण्णी करणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* क्लीनचिट मिळूनही ड्रायक्लीनिंगची भाषा
मनीष भंगाळे बाबत ते सातत्याने आरोप होत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. भंगाळे प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागलेला नाही. उलट भंगाळेने आरोप लावल्यानंतर एडीजी एटीएसची कमिटी बनवून मी १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासांतच खडसेंना क्लीन चिट मिळाली आणि भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं गेलं. त्यानंतर कित्येक दिवस तो जेलमध्ये होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. खडसे यांनी ड्राय क्लीनरचा उल्लेख करत फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावरूनही फडणवीस यांनी टोला हाणला. भंगाळेच्या प्रकरणात मिळालेल्या क्लीन चिट मिळूनही ते लॉन्ड्रीतली किंवा ड्राय क्लीनिंगची क्लीन चिट म्हणत असतील तर काय बोलावं, असं फडणवीस म्हणाले.
* न्यायालयाने खडसेंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले
खडसे यांना एमआयडीसीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, असे नमूद करत याबाबत घटनाक्रम फडणवीस यांनी सांगितला. एमआयडीसीच्या प्रकरणात खडसेंना पद सोडावं लागलं. खडसे यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: त्याबाबतची बैठक घेतली होती. त्यांच्यावरील आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समिती तयार केली. या समितीचा अहवाल आमच्याकडे आला. पण त्याआधीच काही जण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने खडसे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करा, असा निर्णय दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला किंवा तो आकसापोटी दाखल करण्यात आला असे म्हणता येणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयाने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतरही संबंधित प्रकरणात दोनच महिन्यात आम्ही उच्च न्यायालयात अहवाल दाखल केला पण तो कोर्टाने स्वीकारला नाही. त्यावर प्रतिपक्षाकडून हस्तक्षेप केला गेला. अनेक मुद्दे मांडले गेले. त्यामुळे तो अहवाल मान्य झाला नाही, असे नमूद करत माझ्याबद्दल विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कारण नाही, असे फडणवीस यांनी खडसेंना सुनावले. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही तक्रारी असू शकतात. आम्ही घरातल्या घरात बसून, त्यांच्याशी चर्चा करून त्या तक्रारींचे निरसन करू, असेही फडणवीस पुढे म्हणाले. खडसेंबाबतची सर्व वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींना माहीत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.