नवी दिल्ली : आर्य समाजाचे प्रख्यात नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आर्य समाज नेते स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवयव निकामी झाल्याने ते मंगळवारपासून व्हेंटिलेटरवर होते.
स्वामी अग्निवेश यांच्या शरीरातील अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. मंगळवारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांना कार्डियक अरेस्ट आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र सायंकाळी 6.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती रुग्णालयाने दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. स्वामी अग्निवेश यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नवी दिल्लीतील 7 जंतर मंतर येथील कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. गुरूग्राम जिल्ह्यातील बहालप येथील अग्निलोक आश्रमात सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार केली जातील.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
* राजकीय कारकीर्द
21 सप्टेंबरमध्ये, 1939 ला स्वामी अग्निवेश यांचा जन्म झाला. 1970 मध्ये त्यांनी ‘आर्य सभा’ नावाचा राजकीय पक्ष बनवला. 1977 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले आणि हरयाणा सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्रिपदही भूषवले. तसेच 1981 ला त्यांनी ‘बंधुआ मुक्ति मोर्चा’ नावाच्या संघटनेची स्थापना केली. 2011 ला त्यांनी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच ते ‘बिग बॉस’च्या घरातही काही दिवस राहिले होते.