पंढरपूर : कोरोनामुक्त झालेले भाजपचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीतून विविध फुलांचा जेसीबीतून वर्षाव करण्यात आला. पंढरपूरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज (शनिवारी) पंढरपुरात गोपीचंद पडळकरांवर 100 पोती भरुन फुले उधळली.
आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर आज शनिवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीमधून फुले उधळली. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के, संजय माने या समर्थकांनी गुलाब, झेंडू, निशिगंधा, शेवंती अशा फुलांचा वर्षाव केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोपीचंद पडळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशीच समोर आला होता. त्यानंतर पडळकर यांनी पंढरपुरात येऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली. पडळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पडळकर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पंढरपुरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. यावेळी आनंद झालेल्या समर्थकांनी थेट जेसीबीमधून फुलांचा वर्षाव पडळकर यांच्यावर केला.
* याच पंढरपुरात केले होते वादग्रस्त विधान
गोपीचंद पडळकर हे सांगलीचे आहेत. पण सोलापूरच्या दौ-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. यावर पडळकर यांच्याविरोधात संतापाची लाट उमटली होती. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर जून महिन्यात याच पंढरपुरात म्हटले होते. त्यामुळे राज्यभर पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने टीका आणि आंदोलन केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. मात्र भाजपाने यावर सावध पवित्रा घेत ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगितले होते.