सोलापूर : लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने आर्थिक दिलासा दिला आहे. राज्यातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख होतो. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता स्पर्धक खासगी व सहकारी दूध संघाच्या बरोबरीने दुध दर देण्याचा प्रयत्न जिल्हा संघाने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दूध संघाचे नूतन चेअरमन माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ केली आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून प्रति लिटर वीस रुपये दराने खरेदी केले जाणारे गाईचे दूध 24 रुपये 50 पैसे या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांनी दिली.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या दूध संघाला बाहेर काढण्यासाठी नूतन अध्यक्ष दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजना करत असतानाच शेतकऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. दूध खरेदी जरा वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीतील बळिराजाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संघांला दूध द्यावे, असे आवाहनही दूध संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची वाटचाल व कारभार हा शेतकरी केंद्रबिंदू मानून चालविला जात आहे. दूध संघाला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– दिलीप माने, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ