बार्शी : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेमुळे मिरवणूक काढण्यास बंदी असतानाही तालुक्यातील चुंब येथे लग्नाची वरात काढल्यामुळे ती वरात थेट पोलिस ठाण्याच्या दारात घेऊन जाण्याची नामुष्की ओढावली. यात नवरदेवासह बँड पथकासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिरवणुकीचे आयोजक नवरदेव सादिक बादशाह सय्यद, बादशाह बाबा सय्यद, युनूस बादशाह सय्यद (सर्व रा. चुंब ता. बार्शी व बँड पथकाचे मालक), निलेश मस्के (रा. राऊत चाळ, बार्शी) व त्याचे चार कामगार यांच्याविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पो.कॉ. रामदास आप्पाराव साठे यांनी सरकारी फिर्याद दिली आहे.
चुंब येथील सादिक बादशाह सय्यद याचे बीड जिल्ह्यात लग्न असल्यामुळे त्यांनी गावात लग्नाची वरात काढली होती. सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेमुळे मिरवणुकीस बंदी असतानाही ही मिरवणूक काढल्याबद्दल तालुका पोलिसाना माहिती मिळाल्यानंतर सपोनि. शिवाजी जायपत्रे यांनी चुंब येथे पोलिस पथक पाठविले असता त्यांना आदर्श बँजोवर गाणी वाजत असून वरात सुरु असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून वरातीतील लोक पळून गेले.
त्यांच्याविरुध्द आदेशाचे उल्लंघन करुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हयगयीने, मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कायदा कलम 188,269,270 व मुंबई पोलिस अधि. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.