बार्शी : कोविड सेंटरमध्ये मिळणार्या सुखसोयींना चटावलेल्या कैद्यांना परत सबजेलमध्ये आणताना पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. यावेळी कैद्यांच्या विरोधामुळे उडालेल्या धुमश्चक्रीमुळे थोडा गोंधळ उडाला. अखेर सर्व कैद्यांना कडक बंदोबस्तामध्ये आणून सबजेलमध्ये घातल्यानंतरच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
येथील तहसील कार्यालयातील सबजेलमध्ये असलेल्या न्यायालयीन कोठडीतील काही कैद्यांना जुलै महिन्याच्या प्रारंभी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्वच कैद्यांना पुढील उपचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात हलविण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याठिकाणी उपचार घेवून बरे झाल्यानंतरही सबजेलपेक्षा अधिक मोकळीक तेथे मिळत असल्याने कैद्यांनी अनेक क्लुप्त्या योजून तेथील आपला मुक्काम वाढविला होता.
या कैद्यांमध्ये खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात गेली सलग तीन ते चार वर्षे कोठडीत असलेल्यांचा समावेश होता. कोविड सेंटरमध्ये नातेवाईक-मित्रपरिवारांना त्यामानाने सहज भेट मिळत होती. घरातून डबा तसेच अन्य पदार्थांची लयलूट होती. त्यातून एका कैद्याने पलायनाची प्रयत्न केला होता. एरवी सबजेलमध्ये सहजासहजी न मिळणार्या अनेक सुखसोयी सेंटरमध्ये सहजच उपलब्ध होत असल्याने ऐनकेनप्रकारे कैद्यांचा तेथील मुक्काम लांबविण्यात येत होता.
या कैद्यांचा तेथील उपद्रव वाढल्यानंतर अन्य रुग्णांना तसेच आरोग्य यंत्रणेला त्याचा त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार त्यांना हलविण्याची मागणी होत होती. अखेरीस त्यांना सबजेलमध्ये नेण्यासाठी पोलिस तेथे गेल्यानंतर कैद्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. प्रारंभी पोलिसांनाही त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांना जबरदस्तीने त्यांना तेथून हलवावे लागले. यावेळी थोडी धुमश्चक्री उडाली. मात्र पोलिसांनी लगेच स्थिती नियंत्रणात आणली