मुंबई : राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातल्या पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी ट्विट करून दिली होती. अखेर आज मंत्रिमंडळात याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलीस दलातील पावणे दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत २ हजार ५० अधिकाऱ्यांसह १८ हजार ८९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १४ हजार ९७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला ३ हजार ७२९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ४६१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
* बेरोजगार तरुणांमध्ये समाधान
पोलीस भरतीबाबत सरकारने आज अधिकृत घोषणा केल्याने बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळाल्याने बेरोजगार तरुणांने समाधान व्यक्त केलं आहे.