पंढरपूर : पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने कासाळ नदी ओढ्याल पूर आला आहे. ओढ्याचे नदीत रुपांतर झाले आहे.
दरम्यान शिंगोर्णी येथून एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामध्ये चालक बेपत्ता झाला आहे. अचानक झालेल्या ढगफूटीमुळे या भागात हाहाकार उडाला आहे. गेल्या वीस वर्षानंतर या भागात मोठा पाऊस झाला आहे.
मुसळधार पावसामुळे कासाळ ओढ्याला पूर आला असून पूराच्या पाण्यात अनेक पीके वाहून गेली आहेत. ओढ्याकाठचे विजेचे खांब देखील वाहून गेल्याने आठ ते दहा गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान उपरी येथील पंढरपूर – सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धोका निर्माण झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रात्री अचानक परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस,डाळींब,पपई यासह शेती पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मागील तीन चार दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळे ओढ्यावरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पळशी,सुपली,गार्डी या गावांचा थेट संपर्क ही तुटला आहे.
पाण्याच्या प्रवाहामध्ये एक चारचाकी गाडीसह दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरू आहे. प्रशासनाने ओढ्याकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान भीमानदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.