मुंबई : राज्यात तब्बल १२ हजारांहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मात्र एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्य सरकारने पोलीस भरती करणे योग्य नाही, सरकारचा हा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखा असल्याचे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी मांडले आहे. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत खासदार संभाजीराजे म्हणाले की, राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय योग्य नाही, आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज व्यथित आहे. त्यात सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. ही भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देणारं आहे. मराठा समाजाचे ५८ मोर्चे संपूर्ण बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने यशस्वी झाले.
मराठा समाज मोठा भाऊ म्हणून बघितलं जातं. आज मोठा भाऊ अडचणीत असताना नोकर भरती काढली जाते. आणखी काही काळ थांबावं, जे काही लक्ष केंद्रीत करायचं असेल ते आरक्षण कसं लागू करु शकता याचा विचार करावा. थोड्या दिवसाने भरती करण्यास अडचण काय? पोलिसांवर तणाव आल्यामुळे पोलीस भरती करताय असं म्हणता, पण मास्क घालून पोलीस भरती घेणार कशी? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
तरी जर सरकारने ठरवलं पोलीस भरती करायची आहे ते करु शकतात पण यामुळे मराठा समाजात आक्रोश निर्माण होईल. सगळ्यांना सुखानं राहायचं असेल तर वातावरण गढूळ करु नका, मराठा समाजातल्या मुलांनी काय करायचं? नोकर भरतीला विरोध नाही पण टाईमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार असून त्यांना पत्र पाठवणार आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले.
त्याचसोबत मराठा आरक्षणात दुर्दैवाने राजकारण होत आहे. मी मराठा समाजाचा घटक आहे. मला नेतृत्व करायचं नाही, जे समाज म्हणेल त्याच्या पाठिशी मी उभा आहे. उदयनराजे असो वा मी छत्रपती घराणे एकच आहे. पक्ष बाजूला ठेऊन सगळ्यांनी पंतप्रधानांकडे मराठा समाजासाठी आग्रही मागणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विनायक मेटे काय म्हणता याला अर्थ नाही. मी कोणत्याही नेत्याबद्दल भाष्य केले नाही, प्रत्येकाची आपापली भूमिका आहे. २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ज्या कोणी भूमिका बदलल्या त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे असं सांगत संभाजीराजेंनी नेत्यांना टोला लगावला आहे.