मुंबई : अचानक ठरलेला दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते. त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे. आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम नियोजित होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांची नावं निमंत्रितांच्या यादीत होतं. नंतर या यादीत आनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* इतर मंत्र्यांना माहिती दिली नसल्याने नाराजीचा सूर
आंबेडकर चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही, तसेच इतर मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने नाराजीचा सूर असल्याचे बोलले जाते. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. महाराष्ट्र सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही त्यावेळी उपस्थित होते.