नवी दिल्ली : शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत. या विधेयकाला भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं विरोध केला. अकाली दलाच्या नेत्या हससिमरत कौर बादल यांनी विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
ही दोन्ही विधेयकं शेतकरी हिताची नसल्याचा आरोप करत विरोधकांनी मतदानाआधीच सभात्याग केला. काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विधेयकांवर आवाजी मतदान झालं. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत मंजूर झाली. तर याआधीच एक विधेयक लोकसभेत संमत झालं आहे. या विधेयकांना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशाचं धान्याचं कोठार अशी ओळख असणाऱ्या पंजाब, हरयाणातले हजारो शेतकरी विधेयकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारनं विधेयकं मागे घ्यावीत, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी केली होती. मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही.
लोकसभेत दोन्ही कृषी विधेयकं मंजूर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. ‘ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयकांना मिळालेली मंजुरी शेतकरी आणि शेतीसाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांसमोर समस्या आणि अडत्यांमुळे त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होतील,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याच्या नव्या संधी मिळतील. त्यामुळे त्यांचा नफा वाढेल. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाचा लाभ होईल. अन्नदात्ता सशक्त बनेल, अशी ग्वाही मोदींनी दिली.
* अकाली दलाचा विधेयकांना विरोध
कृषी विधेयकं लोकसभेत मतदानासाठी येण्यापूर्वीच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.