सांगली : दिघंची ते हेरवाड राज्यमार्गाचे कामासाठी राजपूत कंपनीने अवजड वाहतूक केल्यामुळे शेटफळे करगणी रस्ता खराब झाला आहे. तो दुरुस्त करावा, या मागणीसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मनसे आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या डंपर, पोकलेनची आणि कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात मनसेच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक अरुण रेड्डी यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य महामार्ग क्रमांक 153 चे काम गेली सुरू आहे. दिघंची आटपाडी लेंगरेवाडी शेटफळे या गावावरून हा रस्ता जातो. रस्त्याच्या कामासाठी खडी आणि मुरूमाची अवजड वाहतूक शेटफळे करगणी रस्त्यावरून केली जाते. त्यामुळे हा रस्ता खराब झाला होता. तो संबंधित कंपनीने करावा, अशी मागणी मनसेने केली होती.
आज सकाळी मनसेचे तालुक्यातील कार्यकर्ते शेटफळे येथील जोगेश्वरी मंदिर चौकात आले. तेथे त्यांनी घोषणाबाजी केली. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या डंपरच्या काचा फोडल्या. पोकलेनच्या काचाही फोडल्या. यानंतर मनसेचे कार्यकर्ते कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे कार्यालयाची नासधूस आणि तोडफोड केली. यानंतर कार्यकर्त्यांनी पोबारा केला.
यासंबंधी अरुण रेड्डी यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात मनसेचे राजेश जाधव (शेटफळे), अमर पवार (पात्रेवाडी) यांच्यासह सहा कार्यकर्त्यावर गाड्यांची आणि कार्यालयाची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.