सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र मराठा संघटनांचे आंदोलन सुरुच आहे. अशातच आज मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोमवारी सकाळपासून मराठा समाजातील विविध कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले.
त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात आहे.
याशिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी नवीपेठेत सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिका-यांनी पार्क चौकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पुतळा करून त्यावर आसूड ओढले. यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर आंदोलन केले.
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलने करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखून धरला. माढ्यात रस्त्यावर टायर जाळल्यानंतर वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूनी वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली.
* आज एसटी बंद
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्यस्थितीत स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ 21 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. म्हणून एसटीच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 01 मिनिटांपासून ते 21 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.