नागपूर : शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे, अशी टीका आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयकावरुन त्यांना प्रश्न विचारले असता शिवसेनेबाबतची भूमिका मांडली. लोकसभेत आणि राज्यसभेत वेगळी भूमिका असल्याची टीका फडणवीसांनी केली.
‘देवेंद्रजी शिवसेनेनेही या विधेयकांना विरोध दर्शवला आहे. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली. जर ही विधयेकं एवढी चांगली आहेत तर देशात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी खात्री भाजपा देऊ शकेल का?’ या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शिवसेनेला सवयच आहे
शिवसेना हा कनफ्युज पक्ष आहे. याचं कारण लोकसभेतली त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे. पण यात नवल काही नाही. शिवसेनेला ही सवयच आहे. ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. त्यामुळे ते लोकसभेत ते वेगळं बोलतात आणि राज्यसभेत वेगळं बोलतात. जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात आम्ही लोकसभेत समर्थन दिलं आहे. जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय.
* शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी
खरं म्हणजे शिवसेनेने आधी भूमिका ठरवली पाहिजे. शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिका मांडलेली नाही. मला आता त्यांना आव्हान करायचं आहे की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी गॅरंटी घ्यावी ना, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या का झाल्या? याचं उत्तर संजय राऊत देतील का? उगाच शेतकरी प्रश्नावरुन राजकारण करायचं ही गोष्ट सोडली पाहिजे. शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने आधी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे.
* काँग्रेसचा चेहरा उघड झाला आहे
कृषी विधेयकांवरुन काँग्रेस करत असलेलं आंदोलन ही काँग्रेसची लबाडी आहे, अशी टीका आधी त्यांनी केली. या विधेयकांचं आश्वासन काँग्रेसनेच आधी दिलं होतं. आता विरोध करत असल्याने काँग्रेसचा चेहरा उघड झाला,
याशिवाय त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. तसंच राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या वेळी काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तो वाचला नाही. कारण तो वाचला असता तर त्यांनी मोदी सरकारवर कृषि विधेयकांवरुन आरोप केलेच नसते. असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.