टोकियो : लग्न करून संसार थाटण्यास इच्छुक जोडप्यांना जपान सरकारकडून सहा लाख येन म्हणजे जवळपास ४.२५ लाख रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून लग्न करून लवकरात लवकर मूल जन्माला यावे आणि घटत्या जन्मदरावर नियंत्रण मिळवता येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. घटता जन्म दर आणि वृद्धांची वाढती लोकसंख्या लोकसंख्या यावर आता जपान सरकारने मात करण्याचे ठरवले आहे.
जपानमध्ये १०० हून अधिक वयोमान असणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. लॅसेंटच्या अभ्यासानुसार, जन्मदराची हीच स्थिती कायम राहिल्यास जपानमध्ये २०४० या वर्षात वयस्कर मंडळींची संख्या ही लोकसंख्येच्या ३५ टक्क्यांहून अधिक असणार आहे. हा संभाव्य धोका कमी करण्यासाठी जपान सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वयस्कर लोकसंख्येचा देश
मागील वर्षी जपानमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी ८ लाख ६५ हजार बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली. तर, त्या तुलनेत मृत्यूची संख्या ही पाच लाख १२ हजारांहून अधिक होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जन्मदर अधिक असण्याची अपेक्षा सरकारला आहे. मागील वर्षी जपानमध्ये १.४२ इतका जन्मदर होता. तर, या वर्षी यात वाढ होऊन १.८० इतका असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जपानची लोकसंख्या १२.६८ कोटी इतकी असून वयोमानाप्रमाणे जपान हा जगातील सर्वाधिक वयस्कर लोकसंख्येचा देश आहे.
* या आहेत अटी
या योजनेत सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये जोडप्यांचे वय ४० हून अधिक असता कामा नये. त्याशिवाय दोघांचेही एकत्रित उत्पन्न ३८ लाखांहून अधिक असता कामा नये. त्याशिवाय ज्या जोडप्यांचे वय ३५ हून कमी असेल त्यांचे उत्पन्न ३३ लाखांहून अधिक असता कामा नये. त्यांना २.११ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
* इतरही देशातील फंडा
इटलीमध्येही जन्मदर घटत आहे. त्यामुळे बाळ झाल्यानंतर जोडप्याला सरकारकडून ७० हजार रुपये दिले जातात. उत्तर युरोपमधील एस्टोनिया या देशात जन्मदर वाढवण्यासाठी नोकरी करणाऱ्याला दीड वर्षापर्यंत पूर्ण पगारासह सु्ट्टी दिली जाते. त्याशिवाय तीन मुले असलेल्या कुटुंबियांना दर महिन्याला ३०० युरो म्हणजे जवळपास २५ हजार रुपयांचा बोनस दिला जातो.