मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड संतापले आहेत. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं असून त्याविरोधात मी आज एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी काळात पवार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना पाह्यला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कृषीविधेयक बिलावरून राज्यसभेत सदस्यांना दिलेल्या वागणुकीवरून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवशं नारायण सिंह यांचं संपूर्ण वर्तन सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारं आणि अवमूल्यन करणारं आहे. त्यामुळे मी स्वत: निलंबित खासदारांच्या उपोषणात भाग घेऊन एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं पवारांनी सांगितलं.
सिंह यांचं वर्तन संपूर्ण देशानं पाहिलं आहे. त्यामुळे आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो? यामुळे बिहारच्या जनतेमध्ये चिंता व्यक्त केली जात असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली आहे. याचवेळी हे विधेयक मंजूर का करण्यात आलं?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
* आमचा भ्रम निरास झाला
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह हे ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांवर चालणारे आहेत. पण कालच्या वर्तनांनी त्यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. सिंह यांच्याकडून आमचा भ्रम निरास झाला आहे, असं सांगतानाच सदस्यांना निलंबित करून आणि त्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला. त्यामुळे या सदस्यांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केलं. सिंह यांनी तिथे जाऊन गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं. सिंह यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सदनातील सर्व माहिती दिली आहे. तसेच त्यांनी उपोषण करण्याचा निर्णयही घेतला आहे, त्यावर पवारांची प्रतिक्रिया विचारली असता, संपूर्ण देशानं त्यांनी सदस्यांना दिलेली वागणूक पाहिली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.