दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनचा चौथा सामना आज (मंगळवार) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाला आयपीएलमधील पहिल्या सामन्याआधीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
संघातील स्टार खेळाडू जॉस बटलर पहिला सामना खेळू शकणार नाही. तसेच ऑलराउंडर बेन स्टोक्सही आयपीएलच्या 13 व्या सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तसेच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथही पहिला सामना खेळू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु, स्टिव्ह स्मिथ खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्मिथच्या वापसीमुळे संघाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला इंग्लंडच्या दौऱ्यावर मॅनचेस्टरमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ चीन वनडे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं सांगण्यात येत होतं. परंतु, आता स्मिथ आजच्या सामन्यात मैदानावर उतरणार असल्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 6 सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेकडून कर्णधार पदाची धुरा स्टीव स्मिथकडे दिलं होतं. स्मिथ कर्णधार असताना राजस्थानने शेवटच्या 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले होते. आज सीएसके विरूद्ध रंगणाऱ्या सामन्यात स्मिथ व्यतिरिक्त मिलर, आर्चर आणि टॉम कुरेल यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.