सांगली : सांगलीत आज भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आणि आमदार सुरेश खाडे यांच्या घरासमोर ‘हलगी बजाव आंदोलन’ केले. दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी आणि आरक्षण मिळवण्यासाठी राज्याची बाजू ठामपणे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे दिली.
न्यायालयाने आरक्षणास स्थगिती देत यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी हा खटला घटनापीठाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे चालू वर्षात होणारे शैक्षणिक प्रवेश तसेच शासकीय नोकर भरती यामध्ये मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. आरक्षणाचा फैसला होईपर्यंत नोकर भरती करु नये, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठासमोर राज्याची बाजू भक्कमपणे मांडावी आणि मराठा समाजास आरक्षण मिळवून द्यावे, यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सर्व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकावा, अशी मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा क्रांती मोर्चातर्फे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन सुरु केले. क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील व विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज सकाळी भगव्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन आमदार सुरेश खाडे यांच्या घरासमोर तसेच आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जाऊन हलगी बजाव आंदोलन केले.
यावेळी दोन्ही आमदारांनी मोर्चाचे समन्वयक विलास देसाई, डॉ. संजय पाटील, महेश खराडे यांच्याकडे पाठिंब्याची पत्रे सोपवली. आंदोलनात राहुल पाटील, किरण भुजगडे, विजय धुमाळ, संतोष माने, योगेश पाटील, अंकित पाटील, विश्वजित पाटील, राहुल जाधव, अशोक पाटील, नितीन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.