मुंबई : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, निलंबित खासदारांनी सोमवारपासून गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला होता.
कृषी विधेयकासह अन्य महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी याप्रकरणी निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी ट्विट करून शरद पवारांचे आभार मानले आहेत.
“आदरणीय शरद पवार साहेबांनी आमच्या निलंबनाबद्दल आज जाहीर नापसंती व्यक्त केली. इतकंच नाही तर आमच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देत स्वतःही एक दिवसाचे उपोषण ते करत आहेत. आमच्यासाठी ही शंभर हत्तींचे बळ मिळणारी गोष्ट आहे. साहेब, आपले मनापासून आभार.” असे ट्विट राजीव सातव यांनी केले आहे.
* हे आहेत आठ सदस्य
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे खासदार राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* कृषी विधेयकावर चर्चा होऊ दिली नाही
कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती.
पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी देखील शरद पवारांनी यावेळी केली आहे.