दुबई : आयपीएलच्या हंगामात पंचांचा वादग्रस्त निर्णयामुळे वादाचा दुसरा अंक पहायला मिळाला. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात पंच सी. शमशुद्दीन यांनी पहिल्यांदा राजस्थानच्या टॉम करनला बाद घोषित करत. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांशी सल्लामसलत केल्यानंतर शमशुद्दीन यांनी करनला नाबाद घोषित केलं. ज्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात संतापलेला पहायला मिळाला.
राजस्थान रॉयल्स संघ फलंदाजी करत असताना १८ वं षटक दीपक चहर टाकत होता. दीपकचा चेंडू टॉम करनच्या थायपॅड ला लागून धोनीने कॅच घेतला. यावेळी शमशुद्दीन यांनी टॉम करनला बाद ठरवलं. पंचांच्या या निर्णयामुळे टॉम करनला धक्का बसला, परंतू DRS ची संधी गमावल्यामुळे याविरोधात दाद मागणं राजस्थानला शक्य नव्हतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी पंच शमशुद्दीन यांनी लेग अंपायर विनीत कुलकर्णी यांच्याशी सल्लामसलत करुन तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बॉल हा टॉम करनच्या बॅटला लागत नसल्याचं दिसत होतं. याचसोबत धोनीने बॉल पकडण्याआधी तो जमिनीवर पडल्याचंही रिप्लेत दिसत होतं. ज्यामुळे तिसऱ्या पंचांनी टॉम करन नाबाद असल्याचं जाहीर केलं.
नियमानुसार मैदानावरील पंचांनी एखाद्या फलंदाजाला बाद ठरवल्यानंतर तिसरे पंच त्यात हस्तक्षेप करु शकत नाही. म्हणूनच संतापलेल्या धोनीने पंच शमशुद्दीन यांच्याजवळ आपली नाराजी व्यक्त केली. एरवी कॅप्टन कूल म्हणून मैदानावर वावरणाऱ्या धोनीचा संतप्त अवतार यावेळी चाहत्यांना पहायला मिळाला.
याआधीही किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात पंच नितीन मेनन यांनी पंजाबच्या ख्रिस जॉर्डनची एक धाव शॉर्ट रन म्हणून घोषित केली. मात्र प्रत्यक्षात जॉर्डनने ती धाव पूर्ण केल्याचं दिसत होतं. याविरोधात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती.