पंढरपूर / सांगली : दोन वर्षापूर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने फसवणुकीचा डाव मांडला आहे. विठ्ठलाच्या नावाने धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी ते पंढरपुरात आंदोलन करत आहेत. विठ्ठल मंदिरात ‘ढोल बजाओ’ आंदोलन करणाऱ्या पडळकरांनी स्वत:च्या स्वार्थासाठी धनगर आरक्षणाचा ढोल कधीच फोडला आहे. त्यामुळे पडळकरांच्या भाजपप्रणित अजेंड्यापासून धनगर समाजाने सतर्क राहावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
समाजाची सर्वाधिक फसवणूक करणाऱ्या पडळकरांना धनगर आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. पंढरपूरमधील आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट, ‘इव्हेंट’ आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी चार दिवसांपूर्वी धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश राज्य शासनाने काढावा आणि तातडीने दाखले द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच उद्या शुक्रवारी पंढरपूर येथे आरक्षणप्रश्नी ‘ढोल बजाओ’ आंदोलन घोषित केले आहे. त्यासंदर्भात विक्रम ढोणे यांनी आज धनगर विवेक जागृती अभियानाची भूमिका मांडली.
वर्षानुवर्षे धनगर एसटी आरक्षणप्रश्नी फक्त आश्वासने देवून समाजाची मते लाटली जात आहेत. समाजीत स्वयंघोषित नेत्यांना हाताशी धरून राजकीय पक्ष व्होटबँक पॉलिटिक्स करत आहेत. याप्रश्नी समाजाचे होत असलेले शोषण थांबावे म्हणून अभियानाने वस्तुस्थिती मांडून फसव्या प्रवत्तींचा खरा चेहरा उघड करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यातीलच पडळकर हे शिताफीने समाजाला फसवत आहेत हे अभियानाने वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे ढोणे म्हणाले.
* पडळकरांनी हार्दिक पटेलांनाही फसवले!
गोपीचंद पडळकर यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी आरेवाडी (जि. सांगली) येथील बिरोबा देवस्थान ट्रस्टला हाताशी धरून धनगर समाजाचा दसरा मेळावा सुरू केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर हा मेळावा कोणा एका नेत्याच्या प्रमोशनसाठी करायचा नाही, या मेळाव्याला फक्त समाजाच्या नेत्यांना बोलवायचे, तसेच स्टेजवर कुणीही नेत्याने बसायचे नाही असे ठरले. त्याप्रमाणे दोन वर्षे झाले, मात्र तिसऱ्या वर्षी पडळकरांचा मूळ कारस्थानी स्वभाव जागा झाला. त्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना न विचारता स्वत:च्या स्वार्थासाठी तिथे गुजरातमधील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना बोलावले व स्वत:च्या नेतृत्वाचे प्रमोशन केले. माझ्या घरातील कुणी भाजपकडून उभे राहिले तरी मतदान करू नका, अशी बिरोबाच्या नावाने शपथ दिली. प्रत्यक्षात पडळकर हे समाजाच्या भावनेला हात घालून भाजपच्यानेत्यांशी सेटिंग करत होते. आपण भाजपविरोधात लढाई करतोय अशी बतावणी करून पडळकरांनी हार्दिक पटेलांना आरेवाडीच्या मेळाव्याला बोलावले होते, मात्र त्यांचीही फसवणूक करून पडळकर पुढे भाजपात सामिल झाले. महाराष्ट्रातील धनगर समाजाबरोबरच गुजरातच्या हार्दिक पटेलांची फसवणूक करणारे पडळकर हे तर बंडलबाज नेतृत्व आहे.
* म्हणून पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले
लोकसभा निवडणूक आठवड्यावर असताना पडळकरांनी महाड ते मुंबई आंदोलन जाहीर केले. हे आंदोलन जाहीर करत असताना एसटी सर्टिफिकेट घेतल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, असे पडळकरांनी सांगितले होते. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळाले नाही. सवलतींचा बागुलबुवा दाखवून पडळकर मॅनेज झाले. सरकार पाडायला गेलेले पडळकर फडणवीसांचे अभिनंदन करून परत आले. भाजपच्या इशाऱ्यावरून वंचित आघाडीत जावून लोकसभा निवडणुकीला लढले. त्या मतविभागणीचा फायदा भाजपलाच झाला. पडळकरांच्या तोंडी भाजप विरोधाची भाषा होती, मात्र प्रत्यक्ष कृती भाजपच्या सोयीची होती. हे पुढे सिद्ध झाले. पडळकरांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेच्या आमदारकीच्या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. बारामतीत लाखाच्या आसपास धनगर मतदान असल्याने त्यांना भाजपने बारामतीत उभे केले, मात्र तिथे बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्याचा मुद्दा गाजला. पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले.
* मग ‘गॉडगिफ्ट’ फडणवीसांनी जीआर कां काढला नाही?
मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी अध्यादेश काढण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर पडळकरांनी लगेच धनगर आरक्षणासाठी अध्यादेश काढून दाखले देण्याची मागणी केली. मुळात ही मागणी बावळटपणाची आहे. धनगर एसटी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोन वेगळे आणि स्वतंत्र आहेत. धनगर समाजाला महाराष्ट्रात आरक्षण आहे आणि त्याचा जीआरसुद्धा आहे. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र शासनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्र शासनाने शिफारस दिल्यानंतर केंद्र शासन एसटी आरक्षणाला मंजूरी देते त्यानंतर राष्ट्रपती याचा आदेश काढतात. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. असे असताना पडळकर समाजाला चुकीची दिशा दाखवत आहेत असा जी. आर. काढता येत होता तर पडळकरांसाठी ‘गॉडगिफ्ट’ असलेल्या देवेंद्र पडणवीस यांनी तो कां काढला नाही, याचे उत्तरे द्यावे, असा सवाल ढोणे यांनी केला आहे.
* प्रतिज्ञापत्राबाबतीत पडळकरांकडून दिशाभूल
उच्च न्यायालयात धनगर आरक्षणप्रश्नी दाखल असलेल्या याचिकांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल आहे. या प्रतिज्ञापत्रात धनगर व धनगड एक असल्याचे, तसेच धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे असे कुठेही म्हटलेले नाही, मात्र धनगर व धनगड एक असल्याचे प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी दिल्याचे पडळकर हे राणा भीमदेवी थाटात सांगत आहेत. शिवाय मोदी सरकारने या याचिकांमध्ये धनगरांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. भाजप कायदेशीर पातळीवर विरोधी भुमिका घेत असताना पडळकर समाजाला ढोल बडवायला लावून सत्यापासून दूर नेत आहेत. उच्च न्यायालयात घेण्यात आलेल्या भुमिकांसंदर्भात कुणाशीही जाहीर चर्चेची तयारी असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे. पडळकरांचे आंदोलन हे भाजपचे आंदोलन आहे, मात्र ते समाजाचे असल्याचे दाखवण्याची पडळकरांची धडपड आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.