हैदराबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेनामी संपत्तीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जवळपास ७० कोटीची संपत्ती शोधून काढली आहे.
नरसिम्हा रेड्डी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. एसीबीकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली असता अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने जवळपास ७० कोटींची संपत्ती जमवल्याचं समोर आलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नरसिम्हा रेड्डी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिम्हा रेड्डी यांनी भ्रष्ट मार्गाने ही संपत्ती गोळा केली. नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीची सरकारी किंमत साडे सात कोटींच्या आसपास आहे. मात्र बाजारभावानुसार ही रक्कम ७० कोटींपर्यंत आहे.
* अशी आहे बेकायदेशीर संपत्ती
एकूण २५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तेलंगणसाबोत आंध्र प्रदेशातीलही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे ५५ एकर शेतजमीन, सहा प्लॉट, एक व्यवसायिक इमारत, दोन घरं, १५ लाख रोख रक्कम, दोन बँक लॉकर्स, बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक आणि इतर व्यवसाय असल्याचं समोर आलं.