नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण साधेपणानं साजरे झाले. अशातच मोठ्या उत्साहात साजरा होणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे. राज्यातील तसेच नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याचं दीक्षाभूमी स्मारक समितीने सांगितलं आहे.
धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 14 ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात. 14 ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द केला आहे. भारतभरातून येणाऱ्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचीव सुधीर फुलझेले यांनी सांगितलं.
* राजकीय नेत्यांचे आकर्षण
दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबरोबरच राजकीय नेत्यांचंही विशेष आकर्षण राहिलेली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते. विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार झाल्यावर रोहित पवार, धीरज देशमुख यांनीही दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांचे दर्शन घेतले होते. 2018 मध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेत्यांनी हजेरी लावत आंबेडकरी जनतेला संबोधित केले होते.
“सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर सर्वांनी धम्म चक्र प्रवर्तनाचा सोहळा अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन फुलझेले यांनी केलं आहे. तसेच आपापल्या घरी राहूनच सर्वांनी प्रार्थना करावी”
– सुधीर फुलझेले सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती