पंढरपूर : पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव (कैकाडी) (वय-77) यांचं कोरोनामुळे आज शुक्रवारी निधन झालं आहे. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांना कोरोनाची लागण झाली होती.
अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे मूळ अहमदनगर येथील होते. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होतं. तेच कैकाडी मठाचं व्यवस्थापन पाहत होते. विशेष म्हणजे रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतय मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.
* कैकाडी महाराज मठाचा इतिहास
कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. मात्र, पंढरपूर येथील कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यानंतर जेव्हा त्यांचा भक्तगण वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला होता. तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. त्यांनी ज्याचे जे उपासना दैवत त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा, असं सुचवलं. अशा प्रकारे, सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला, असं सांगितलं जातं.
त्या नामजपाचे मंदिर उभारावे अशी इच्छा कैकाडी महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू तुकारामकाका महाराज यांच्याकडे व्यक्त केली. तुकारामकाकांच्या कल्पनेतून तो वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. मठाचे बांधकाम जवळ जवळ आठ वर्षे चालले. चक्रव्युहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली रचना मठाची आहे. एकदा मठात प्रवेश केला, की मध्येच ती प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाली, की बाहेर पडता येते. त्यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात.
दालनांची सुरुवात मातृपूजेने होते. म्हणजे श्रीराम, परशुराम यांच्या मातांपासून. शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या मातांच्या प्रतिमा त्या दालनात आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, ऋषिमुनी ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील नेते या सर्वांना मठात स्थान आहे. इतकेच नव्हे तर ‘युनो’ची संसदही त्या दालनात आहे! नेहरू, पटेल, गांधी, सावरकर, इंदिरा गांधी यांच्या सोबतीने भीम-अर्जुन, आदिमानव, पुराणातील प्रसंग, वेद यांच्याही प्रतिमा मठात आहेत.