मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शाहीन शेख यांची अकरा विरुद्ध सहा मताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवड जाहीर होताच काँग्रेस आयच्या गोटामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेे आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका अर्चना वायचळ यांची दुसऱ्यांदा संधी हुकल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. शिवसेनेचे एक मत फुटल्यामुळे यांच्या चेहर्यावरचे भाव पाहण्यासारखे झाले होते. ही सर्व निवडणूक प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडली.
काँग्रेसच्या शाहीन शेख यांची निवड जाहीर होताच त्यांचा आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे व इतरांनी त्यांचा सत्कार केला. नगरपरिषदेचे एकूण १७ सदस्य असून शिवसेनेचे ६ सदस्य ,भारतीय जनता पार्टीचा १ सदस्य असे एकूण ७ सदस्य तर राष्ट्रवादीचे ५ सदस्य मोहोळ विकास आघाडीचे ३ सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे २ सदस्य भारतीय जनता पार्टी तून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला १ असे दहाचे बलाबल होते. मात्र नगराध्यक्षपदासाठी ऑनलाइन निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी मतदान केले तर शिवसेनेच्या अतुल गावडे यांनी शाहीन शेख यांच्या बाजूने मतदान केले. अकरा विरुद्ध सहा अशा मताने शाहीन शेख या विजयी झाल्या.
शाहीन शेख यांची निवड जाहीर होताच मोहोळ येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्याची आतषबाजी केली. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे यांना सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. यावेळी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, माजी तालुकाध्यक्ष राजेश पवार, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, रशीदखा पठाण, अमजद शेख, दाजी कोकाटे, माजी शहराध्यक्ष किशोर पवार यांच्यासह गवत्या मारुती चौकातील व इतर अन्य अनेक जण उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.