मुंबई : ड्रग्जप्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण मिडियाला चकवा देत अखेर एनसीबी कार्यालयात पोहोचली असून तिच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी उशिरापर्यंत तिची चौकशी चालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकारी दीपिकाची चौकशी करत आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून तिची चौकशी सुरू झाली असून एनसीबी कार्यालयात ती एकटीच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ड्रग्जप्रकरणात नाव आल्याने एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स पाठवले होते. त्यामुळे तिला आज सकाळी 10 वाजता एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहायचे होते. मात्र, दीपिका 15 मिनिटं आधीच एनसीबी कार्यालयात पोहोचली. सर्वांना चकवा देत तोंडाला मास्क लावून दीपिका एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. बरोबर 10 वाजता तिच्या चौकशीला सुरुवात झाली. एनसीबीतील मराठमोळे अधिकारी समीर वानखेडे हे दीपिकाची चौकशी करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दीपिकाच्या चौकशीसाठी 35 प्रश्नांची यादी तयार करण्यात आली असून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचीही समीर वानखेडे हेच चौकशी करणार आहेत. सारा आणि श्रद्धा काही वेळातच एनसीबी कार्यालयात पोहोचणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबली होती. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली. ती रात्रभर झोपली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.