नवी दिल्ली : विराट कोहलीच्या खेळीबद्दल बोलताना क्रिकेट समालोचक सुनील गावसकर यांनी विराट-अनुष्कावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर आता त्यांना अभिनेत्री अनुष्का शर्माने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “मिस्टर गावस्कर मी आपला सन्मान करते पण मला तुमची कमेंट आवडली नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ इच्छिते”, असं म्हणत अनुष्काने गावस्करांना उत्तर देणारी इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.
“मिस्टर गावस्कर आपण माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळीबद्दल बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केला. अनेक वर्षांपासून मला माहिती आहे की क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करता. आपल्याला वाटत नाही का की आम्ही देखील त्याचे हकदार आहोत?”, असा सवाल अनुष्काने गावस्कर यांना विचारलाय.
“आपण दुसऱ्या कोणत्याही शब्दात माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळावर टीका करू शकला असतात. परंतू आपण टीका करत असताना त्यामध्ये माझं नाव देखील घेतलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे बरोबर केलंय?” असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्या 2020 हे वर्ष सुरू आहे मात्र माझ्यासाठी आजही काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. माझं नाव नेहमी क्रिकेट कॉमेन्ट्रीमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खूप सन्मान करते. तुम्ही या खेळाचे लेजेंड आहात. मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते, आपणही समजू शकता की तुम्ही माझं नाव घेतल्यावर मला कसं वाटलं असेल?”, असं अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
* गावस्कर काय म्हणाले होते ?
पंजाबविरूद्धच्या सामन्यात विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. त्याला आपला जलवा दाखवता आला नाही. तसंच क्षेत्ररक्षण करताना त्याने शतकवीर के एल राहुलचे दोन झेल देखील सोडले. त्यामुळे विराटच्या बंगळुरूला सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यानंतर समालोचन करताना ‘विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केलाय’, अशी वादग्रस्त टिप्पणी गावस्कर यांनी केली.
सुनील गावस्कर हे कॉमेंट्रीदरम्यान विराटच्या खेळीबद्दल बोलत होते. त्याच्या खेळीची मिमांसा करताना त्यांनी विराट-अनुष्काबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. “विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला” त्यांच्या या टिप्पणीमुळे विराटचे चाहते नाराज झाले आहेत.
दुसरीकडे गावस्कर यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय, असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत. लॉकडाऊनमध्ये विराट पत्नी अनुष्कासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुनील गावस्कर याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन बोलले असतील असंही म्हटलं जातंय
* सुनील गावस्करांचाही खुलासा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवर बोलताना भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर अनुष्काने इन्टाग्राम पोस्ट लिहीत गावस्करांना सडेतोड उत्तर दिलं. त्यावर गावस्करांनी या सगळ्या प्रकरणावर सखोल खुलासा केलाय. त्या दिवशी बोलताना मी फक्त विराटच्या प्रॅक्टिसवर बोट ठेवलं होतं. यामध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलंय.
मी विराटच्या प्रॅक्टिसबद्दल बोललो. यामध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं. तसंच विराट कोहलीच्या अपयशाला मी अनुष्काला जबाबदार धरलं नाही”, असंही गावस्कर म्हणाले. पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तसंच माझ्या वक्तव्याला तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न झाला. अनुष्का आणि विराटला मी सांगू इच्छितो की माझी व्हीडिओ क्लिप तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका. माझ्याकडून कुठलाही गैरसमज नाही.”