नवी दिल्ली : विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना अधिकार देत असताना देखील लोक विरोध करू लागले आहेत. शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांगलाचा निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगेअंतर्गत उत्तराखंडात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील पहिल्या चार मजली सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. आता हरिद्वार कुंभमेळ्याच्या वेळी संपूर्ण जगाला निर्मळ गंगास्नानाचा अनुभव घेता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. नव्या कायद्यामुळे यांच्या काळ्या कमाईचा मार्गच बंद झालेला असल्याचे ते म्हणाले. यामुळेच विरोधक त्रस्त असल्याची कोपरखळी त्यांनी मारली. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधी पक्ष हे ना शेतकऱ्यांसोबत आहेत, ना जवानांसोबत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. देशातील शेतकरी खुल्या बाजारात आपले पीक विकू नये असेच विरोधी पक्षाला वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी ज्या साधनांची पूजा करतात, त्या साधनांना आग लावून विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आम्ही MSP लागू करू असे हे लोक अनेक वर्षे बोलत राहिले, मात्र त्यांनी लागू केलाच नाही. मात्र MSP लागू करण्याचे काम स्वामीनाथन आयोगाच्या इच्छेनुसार आमच्या सरकारने केले असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे लोक आज MSP बाबतही लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. देशात MSP देखील राहील आणि शेतकऱ्यांना देशात कोणत्याही ठिकाणी आपले पीक विकण्याचे स्वातंत्र्य असेल असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. मात्र हे स्वातंत्र्य काही लोकांना मात्र सहनच होत नसल्याचा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला.
आपल्या संबोधनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत विरोध पक्षांवर हल्लाबोल केला. हे लोक ना शेतकऱ्यांसोबत आहेत, ना सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत. आमच्या सरकारने वन रँक, वन पेन्शन या योजनेचा लाभ जवानांना मिळवून दिला, त्यावेळीही विरोधी पक्षाने विरोधच केला होता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.