वॉशिंग्टन : जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अद्यापही समोर आले नाहीत. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर, विविध शहरातून ५० हून अधिकजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
डेनवरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या संघर्षानंतर चार आंदोलकांना अटक केली. तर, मिनियापोलिसमध्ये वाहतूक कोंडी करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात आली. न्यूयॉर्क बुधवारी रात्री उशिरा ५० जणांना अटक करण्यात आली. पोर्टलँडमध्ये आंदोलकांमुळे तणावात मोठी वाढ झाली. पोलिसांनी या भागात दंगलीची स्थिती असल्याचे जाहीर केले. यावेळी ११ जणांना अटक करण्यात आली. या आंदोलकांकडून हातोडे, रायफल्स जप्त करण्यात आल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्रम्प यांनी मतमोजणीत गोंधळ झाला असल्याचा आरोप केला होता. ट्रम्प समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांनी डेट्रॉइट, मिशिगन आणि एरिजोना या भागातील मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला. डेट्राइटमध्ये मतमोजणी बंद करण्याची मागणी केली.
फिनिक्समध्येही जवळपास १५० ट्रम्प समर्थक एकत्र आले होते. यातील काहीजणांकडे शस्त्रे होती. मॅरिकोपा काउंटी येथील मतमोजणी केंद्रावर त्यांनी गोंधळ सुरू केला. वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी रोखण्यात आली.
ट्रम्प समर्थकांसह विरोधकही रस्त्यांवर उतरले असून त्यांनी प्रत्येक मत मोजण्याची मागणी केली. वॉशिंग्टन स्केअर पार्कमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या ६० जणांच्या अटकेनंतर तणाव निर्माण झाला. त्याआधी आंदोलकांनी ‘काउंट द व्होट’ अशी घोषणाबाजी केली.