सोलापूर : आयुष्यातील कित्येक दशके जंगलात वनसाधना करणाऱ्या, जंगल प्रत्यक्ष जगलेला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा आज वाढदिवस. हा वाढदिवस राज्य सरकार ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करत आहे. यानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या यशवंत सुत मिल कंपाउंड येथील निवासस्थानी जावून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वनसाधनेचा, वनअभ्यास कार्याचा गौरव केला.
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वनसाधना करुन सोलापूरच्या मायभूमीत कायमच्या वास्तव्याला आले आहेत. तिथली सारी जंगले त्यांनी पायाखाली घातली. त्यातले पक्षी, प्राणी, वृक्ष या साऱ्यांमध्ये दडलेलं एक अद्भूत जगणं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांनी तब्बल एक लाख नव्या शब्दांचं योगदान दिलंय. त्यांचा पक्षीकोश, प्राणीकोश, वृक्षकोश यापूर्वी प्रसिद्ध झालाय. मत्स्यकोशाचे काम सुरू आहे. ही सारी कामे प्रचंड धडपडीची आणि भावी पिढ्यांसाठी अत्यंत मोलाची आहेत. २००६ साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही होते.
यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, उद्योगपती दत्ता सुरवसे, ॲड.जे. जे. कुलकर्णी, लेखक मारुती कटकधोंड, श्रीनिवास चितमपल्ली यांची उपस्थिती होती.