दिसपूर : ईशान्य भारतात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी आग अजूनही भडकलेलीच आहे. आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती.
ही 150 दिवसानंतरही येथे आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत आहेत. ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर परिसरातील 3 हजार नागरिकांवर घर सोडून स्थलांतरितांच्या कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी अनेकजण आपल्या घरी परतले आहेत. पण ज्यांची घरं आग लागलेल्या ठिकाणांपासून जवळ आहेत, त्यांना अजूनही कॅम्पमध्येत राहावं लागत आहे. या आगीत आपली घरं गमावलेल्या 12 कुटुंबांना प्रत्येक 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीकडून देण्यात आली आहे. तर घरदार सोडून कॅम्पमध्ये राहावं लागत असलेल्या कुटुंबाला कंपनीकडून महिन्याला ५० हजार रुपये देण्यात येत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.
* भारतातील मोठ्या आगीच्या घटना
भारतात यापूर्वीही अशाप्रकारची आग पाहायला मिळाली आहे. 1967 मध्ये आसामच्यात शिवसागर जिल्ह्यात ONGC च्या एका प्लॅन्टमध्ये आग लागली होती. ही आग मोठ्या परिश्रमानंतर तब्बल 90 दिवसांनी विझावण्यात यश आले. आंध्र प्रदेशातील ONGC प्लॅन्टमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी 65 दिवस लागले होते. तर 2005 मध्ये आसामच्या डिकोम इथं ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीत लागलेली आग 20 दिवस चालली होती.