अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृह विभागाचे पोलिस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश दिले असल्याची माहिती अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे.
अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांची (आय जी ) परवानगी घेऊन अर्णब यांच्यासह तिन्ही आरोपींना तळोजा कारागृहात आणलं गेल्याची माहिती अलिबाग कारागृह अधीक्षक ए . टी. पाटील यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला होणार आहे. शनिवारी राखून ठेवलेला निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजाकडे येताना केली आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.
अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक अर्णव गोस्वामींना तातडीनं कोणताही दिलासा देण्यास काल शनिवारी मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं कनिष्ठ न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने त्यात तूर्तास हस्तक्षेप करणं न्यायीक ठरणार नाही, असं स्पष्ट करत आपला निकाल राखून ठेवला. हा निकाल आपण लवकरात लवकर जाहीर करू मात्र तोपर्यंत गोस्वामींसह इतर आरोपी कनिष्ठ जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात. हा अर्ज दाखल झाल्यापासून त्यावर कनिष्ठ न्यायालयानं चार दिवसात निर्णय द्यावा, असे निर्देष हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळे तूर्तास पुढील आठवड्यापर्यंत अर्णव गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.