मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगात मुक्काम असला तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच होता. परंतु, गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची रवानगी थेट तळोजा तुरुंगात केली आहे. या वेळी गोस्वामी यांनी तुरुंग अधीक्षकांना मारहाण केल्याचा दावा केला.
तळोजा तुरुंगात पोलीस व्हॅनमधून गोस्वामी यांना नेले जात होते. त्यावेळी ते बाहेरील व्यक्तींना ओरडून सांगत होते की, मला अलिबागच्या तुरुंग अधीक्षकांनी मारहाण केली. मला जबरदस्तीने तळोजा तुरुंगात नेले जात आहे. माझ्या जिवाला धोका आहे. कुणी तरी कृपया न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा. मी वकिलांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मला तुरुंग अधीक्षकांनी मारहाण केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना तुरुंगात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. अलिबाग तुरुंग प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था या शाळेत केली आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होती. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते.
गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली आहे.
* कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो ?
शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असताना सापडले. यामुळे त्यांची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले आहे की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग तुरुंगाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा तुरुंगात हलवले.