मुंबई : दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते.धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाणून घेवूया सविस्तर.
धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घ्या. त्यावर स्वस्तिक काढा. त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावा. दिव्याला हळद-कुंकु आणि तांदुळ लावा. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा. नमस्कार करावा. हे लक्षात असू द्या की पूजा करण्याआधी पाटाची दिशा ही मुख्य दाराच्या दक्षिणेला असावी.
आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कापणीचा हंगाम ओसरत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याच्या राशी असतात. तर दिवाळी लग्न सोहळ्यासाठी सोनं खरेदी करण्यासाठी सराफांकडे महिलांची लगबग असते. दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडे गर्दी होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यांकडे येणारं धन अशा दोन्ही अर्थानं या धनाची पूजा या दिवशी केली जाते.
धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ सुरू झाली असंही सांगितलं जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते. औषधी वनस्पती लावल्या जातात. या दिवशी झेंडु आणि शेवताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्यानं या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घर आणि गावं उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे. तिथे दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.