सांगली : बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवावी या मागणीसाठी सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा निघाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे यात्रा सुरू केली आहे. अनवाणी पायाने बैलगाडीमध्ये प्रतिकात्मक बैलाची अंत्ययात्रा घेऊन जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर धडक देणार आहेत. हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर रोजी जाधव हे मातोश्रीवर धडकणार आहेत.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र 2011 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विविध शेतकरी संघटना बैलगाडीवरील शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र, सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत सांगलीच्या इस्लामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव हे सुद्धा वारंवार मागणी करत आहेत.
* मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द पाळावा
4 वर्षांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमचे सरकार आल्यावर बैलगाडी शर्यतीला परवानगी देऊ, असा शब्द दिला होता. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळावा, त्याची आठवण करून देण्यासाठी जाधव यांनी सांगली ते मुंबई बैलगाडी पदयात्रा दिवाळीच्या दिवशी सुरू केली आहे. यात बैलांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जाधव यांनी ही पदयात्रा काढली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतवरील बंदी उठवावी, अशी मागणी विजय जाधव यांनी केली आहे.