तमिळनाडू : निवडणुका जिंकण्यासाठी कुणी काय शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. अशीच एक शक्कल तमिळनाडू भाजपकडून वापरली जात आहे. तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी मात्र आतापासूनच करण्यात येत आहे. या निवडणुकीत आपल्याला 25 जागा मिळाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपाचा उमेदवार जिंकून आणल्यास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला एक इनोव्हा कार भेट देणार आहेत.
तमिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्यांनी असं जाहीर केलंय की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा उमेदवार जर जिंकून आला तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एक एक इनोव्हा कार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
याआधीही त्यांनी आपल्या पक्षातील लोकांना याबाबत आश्वासन दिलं होतं. गेल्या रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या या आश्वासनाची आठवण पक्षकार्यकर्त्यांना करुन दिली. तसेच कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीच्या दृष्टीने कृतीशील होण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतामधील अनेक राज्यांमध्ये विजयी कमळ फुलवणाऱ्या भाजपाचा दाक्षिणात्य राज्यांमध्ये फारसा प्रभाव दिसत नाही. तामिळनाडू अशाच राज्यांपैकी एक आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकींमध्ये आपली दखल घ्यावी लागेल इतक्या जागा जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सध्या भाजपा आणि एआयएडीएमकेची युती आहे. मात्र वेटरीवल यात्रेच्या मुद्द्यावरुन या दोन्ही पक्षांचे मतभेद झाले होते.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन पहिल्यांदा दिल्याचं वृत्त द फ्रि प्रेस जर्नलने दिलं होतं. या बैठकीत निवडणुकीत जिंकण्याच्या तयारीसाठी आतापासूनच कंबर कसण्याचे आवाहन त्यांनी केलं होतं. पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्याला किमान 25 आमदार निवडून आणून राज्यात महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, असं म्हटलं आहे. तसेच त्यासाठी आपला आमदार निवडून आला तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला एक इनोव्हा कार देण्याचं आश्वासनही त्यांनी दिले आहे.
* पदाधिकाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या
तमिळनाडूमध्ये हा प्रकार सर्रास चालतो. तिथे दोन प्रमुख पक्ष द्रमुक आणि अण्णा-द्रमुक अनेकदा निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या देतात. दक्षिण भारतात भाजपचा फारसा प्रभाव नाहीये. तिथे आपले दखलपात्र अस्तित्व निर्माण व्हावे, म्हणून भाजप झटत आहे. सध्या भाजप अण्णाद्रमुक पक्षासोबत युती करुन आहे. मात्र त्यांच्यातील संबंधही नाजूक बनलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
* गृहमंत्री शाह २१ नोव्हेंबरला संबोधित करणार
जाती आणि धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन करणाऱ्या यात्रांना परवानगी देऊ नये अशी भूमिका एआयएडीएमकेने आपल्या मुखपत्रामधून व्यक्त केली आहे. भाजपाला एआयएडीएमकेसोबतची युती कायम ठेवायची असून या मतभेदांनंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह २१ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.