नवी दिल्ली : महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. पटेल यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. बुधवारी पहाटे गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्विजय सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
जवळपास महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमद पटेल यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी आज पहाटे त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अहमद पटेल यांच्या निधनाबाबत माहिती दिली. फैजल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला’. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, ‘मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी’.
* पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले की, त्यांनी अनेक वर्षे जनतेची सेवा केली. तल्लख बुद्धीसाठी ते ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाला मजबूत बनविण्यामध्ये त्यांची भूमिका होती, ती नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचा मुलगा फैजल यांच्याशी फोनवर बोललो. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* काँग्रेसचा आधारस्तंभ गेला
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’.
दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवरुन अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अहमदजी केवळ अनुभवी सहकारी नव्हते, मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ले घ्यायचे. ते नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’.
* अहमद पटेलांचा संक्षिप्त परिचय
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं.
त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.