पंढरपूर : स्वत:च्या कर्तृत्वावर संघर्ष करीत पुढे आलेले आमदार भारत भालके यांचे राञी निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते. यामुळे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके , पत्नी जयश्रीताई भालके , मुली ,जावई असा परिवार आहे.
आमदार भारत भालके गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले. मात्र पुन्हा त्यांची प्रकृतीत अस्वस्थता जाणवू लागल्याने मागील दहा दिवसापासून त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते.
काल शुक्रवार सकाळपासून आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. याचबरोबर शरद पवार यांनी मुंबई येथील तज्ञ डाॅक्टर व पुणे येथील डाॅक्टरांची चर्चा घडवून आणली. मात्र डाॅक्टरांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
* आक्रमक नेता गेला, तालुक्यात शोक
आमदार भारत भालके यांनी सुरुवातीपासूनच संघर्ष करीत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. २००९ पासून सलग तीन वेळा वेगवेगळ्या पक्षातून ते आमदार झाले. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख होती. आमदार भारत भालके हे 2002 सालापासून पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. 1992 साली विठ्ठल कारखान्याच्या संचालक पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा त्यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव करीत ते प्रथम विधानसभेत पोहोचले.
२०१४ मध्ये आमदार प्रशांत परिचारक २०१९ मध्ये माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचाही त्यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव करीत त्यांनी हॅट्रिक केली होती. जनसामन्यात सहज मिसळणे तसेच ग्रामीण व रांगड वक्तृत्व यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते आपले वाटतं होते. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दु:खात भालके सामील होत असल्याने २०१४ मध्ये मोदी लाटेतही भालकेंनी सहज विजय मिळवला होता.