सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी गमावली. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात भारताला हिमालया एवढे आव्हान दिले होते. स्टीव्ह स्मिथकडून स्फोटक शतकी खेळी केली आणि अन्य चार जणांनी धडाकेबाज अर्धशतक करून संघाला 389 पर्यंत मजल मारून दिली. उत्तरादाखल भारताला 9 बाद 338 इतक्या धावा करता आल्या.
मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात विराट कोहलीने 89 धावांची खेळी केली. त्यामुळे सिडनीच्या क्रिकेट मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची आजची सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सलग दुसऱ्या वेळेस साडेतीनशेहून अधिक धावसंख्या उभारली होती. एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, लबूशेन व मॅक्सवेल या चारही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. तर स्मिथने पहिल्या सामन्यात केलेली आक्रमक खेळी तशीच पुढे सुरु ठेवत 64 चेंडूत 104 धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 389 धावा करत भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याबदल्यात भारतीय संघ 50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 375 धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यात कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली होती. तर भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 5.40 च्या सरासरीने 54 धावा देऊन चार बळी घेतले. यानंतर जोश हेझलवूडने तीन बळी टिपले होते. व मिशेल स्टार्कने एक विकेट घेतली होती.
* विराटचा कारनामा
ऑस्ट्रेलियाविरोधातील हा दुसरा सामना विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना ठरला. टीम इंडियाकडून 250 सामने खेळणारा विराट नववा खेळाडू ठरला. याआधी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर, अजहर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी या खेळाडूंनी टीम इंडियाकडून 250 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.
विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 हजार धावा पूर्ण केल्या. विराट अशी कामगिरी करणारा एकूण आठवा तर टीम इंडियाचा तिसरा खेळाडू ठरला. टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन्ही खेळाडूंनीच 22 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यातील (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) 462 डावांमध्ये 56.15 च्या सरासरीने 22 हजार 11 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने एकूण 70 शतकं तर 105 अर्धशतकं लगावली आहेत.