कर्जत : कर्जत तालुक्यातील शेगुड जवळ करमाळा तालुक्यातील कुंदेवाडी येथील एका 35 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून त्यास ओढत जवळच्या शेतात नेले, या युवकांचे रक्त एका जागी आढळले असून त्यानंतर त्याचा मृतदेहही आढळला. यामुळे शेगुड परिसरात खळबळ उडाली आहे.
विजयदीप जगताप यांनी कर्जत- करमाळा रस्त्यावर राधेश्याम मंगल कार्यालयाजवळ बिबट्या स्वत: पाहिला असल्याची माहिती दिली आहे. पाथर्डीत तीन मुलांचे बिबट्याने बळी घेतले असून यापूर्वी पाथर्डीत चार बिबटे पकडण्यात आले. बिबट्यांचा धुमाकूळ आता इतर तालुक्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यात आष्टीत बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. पाथर्डीतील बिबटे आष्टी, करमाळा मार्गाने आता कर्जतमध्ये गेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पार्श्वभूमीवर आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी वन विभागाचे अधिकारी छबिल वाढ यांच्यासोबत चर्चा केली व पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवावी, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही, स्वत:चा जीवही धोक्यात घालावा लागणार नाही, असे सांगितले.
तालुक्याच्या हद्दीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या वेळी शेतकऱ्यांनी, सध्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतामध्ये जावे लागते यामुळे तर असे हल्ले होऊ लागले तर जीव धोक्यात येत आहे आणि आम्ही घाबरून गेलो आहोत, त्यामुळे वीज पुरवठा शेतीसाठी दिवसा करावा अशी मागणी केली. यावर खेडकर यांनी तातडीने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जर पाणी दिले नाही तर पिके जळून जातील आणि बिबट्याने हल्ला केला तर शेतकऱ्यांचा जीव जाईल त्यामुळे याबाबत तातडीने गांभीर्याने विचार करून तत्काळ शेतीसाठी दिवसात पूर्ण दाबाने वीज सोडावी अशी मागणी केली आहे.