पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मंगळवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्यक्तिला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
अशातच आता हर्षवर्धन जाधव सध्या पोलीस कोठडीची शिक्षा भोगत असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव अतिशय दयनीय अवस्थेत दिसत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील हर्षवर्धन जाधव यांची अवस्था पाहून त्यांना मारहाण झाल्याचं दिसत आहे. तसेच त्यांचा शर्ट देखील फाटला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात फिर्यादीनेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे.
तसेच आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि अटक ही एक राजकीय डावपेच असल्याचंही जाधव यांनी न्यायलयात म्हटलं आहे. जाधव यांना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधाव यांनी पुण्यात एका छोट्या अपघाताच्या वादातून दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अमन चड्डा यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अमन चड्डा यांनी तक्रारीत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमन चड्डा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पुण्यातील औंध भागातून माझे आई वडील दुचाकीवरून चालले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या गाडीचा अचानक दरवाजा उघडला आणि माझ्या आई वडिलांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे.
वडिलांचीही नुकतीच एन्जीओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झालेले आहे. हर्षवर्धन जाधवांना हे सर्व सांगूनही ते माझ्या वडिलांना छातीवर बुक्क्या व लाथांनी मारहाण करत राहिले आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर असलेली महिला इशा झा यांनी देखील शिवीगाळ केली आणि माझ्या आई वडिलांना मारहाण केली. माझ्या आईला लाथ मारून तिला ढकलून दिले. यामुळे आईच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, असंही अमन चड्डा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.