सोलापूर : दुचाकी व टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आजोबा व नातू यांचा मृत्यू झाला तर आजी जखमी झाली. हा अपघात काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरानजीक असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहत चौकात झाला.
बाळू शिवाजी पवार (वय 50), ईश्वर महेश पवार (वय 11, रा. जय मल्हार चौक, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर नंदा बाळू पवार (वय 45, रा. सोलापूर) असे जखमी आजीचे नाव आहे. याची मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बाळू पवार, नातू ईश्वर पवार व नंदा पवार हे दुचाकीवरून सोलापूरहून मोहोळच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, त्यांची मोटारसायकल चंद्रमौळी वसाहत चौकात आली असता, त्याच वेळी भरधाव येणाऱ्या टेम्पोने (क्र. एम एच 11 – एम 5513) अचानक उजव्या बाजूला वळण घेत मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात बाळू पवार यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, तर ईश्वर पवार हा गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुणालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर जखमी आजी नंदा पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची फिर्याद दादासाहेब भानुदास पवार (रा. ढोकबाभूळगाव) यांनी मोहोळ पोलिसात दिली.