मुंबई : ईडीच्या आड केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार समजले जाणारे शरद पवार यांनी ईडीवरुन मोठे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून नोटिसा देण्यात आल्या आहे. याआधी राज्यात असा प्रकार कधीच घडला नाही. ईडीच्या आड भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे’, अशी टीका शरद पवार यांनी केली. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी ही नोटीस मागे घेतली होती. मी कोणत्याही बँकेचा सदस्य नव्हतो, साधे खाते सुद्धा बँकेत नव्हते. तरीही नोटीस पाठवणार होते, ईडीच्या आड केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे’, अशी टीका पवार यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हे सरकार कधी पडणार, यासाठी वेगवेगळ्या तारखा देत आहे. आधी त्यांनी दोन महिन्यांची मुदत दिली होती. नंतर सहा महिने सांगितले होते. पण सहा महिन्यात महाविकास आघाडी सरकार काही कोसळले नाही. पण त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी नोव्हेंबरमध्ये सरकार पडणार, असं सांगितले. उलट ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. ठाकरे सरकार हे स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
* एकनाथ खडसेंनी मागितली मुदत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयानं ( ED) नोटीस बजावली आहे. एकनाथ खडसे यांनी EDला विनंती पत्र लिहिलं आहे. कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानं चौकशीसाठी 14 दिवसांची मुभा मिळावी, अशी विनंती एकनाथ खडसे यांनी ED कडे केली आहे. त्याप्रमाणे प्रकृती बरी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.